साडेआठ लाख ‘आयुष्मान’ कार्डधारक
रत्नागिरी:- ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४ हजार ४१० रुग्णांनी मोफत आणि रोखरहित उपचारांचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यातील १६ लाख ५७ हजार ६६५ पात्र लाभार्थ्यांपैकी ८ लाख ६३ हजार ७३० जणांना आयुष्मान कार्ड वितरित करण्यात आले असून, ७० वर्षांवरील २७ हजार ११२ वृद्धांना ‘वय वंदना कार्ड’ देण्यात आले आहे. अद्याप कार्ड न काढलेल्या पात्र नागरिकांनी तातडीने ते काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती अस्मिता केंद्रे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २८ जुलै २०२३ च्या निर्णयानुसार या योजनेची व्याप्ती वाढवून राज्यातील सर्व कुटुंबांचा यात समावेश करण्यात आला आहे. १ जुलै २०२४ पासून या दोन्ही योजना एकत्रितपणे राबवल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत आरोग्य संरक्षण मिळते. कुटुंबातील एक किंवा सर्व सदस्य या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. तसेच ‘वय वंदना’ योजनेअंतर्गत ७० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त पाच लाख रुपयांचे आरोग्य कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांसह रत्नागिरी, चिपळूण, खेड, लांजा आणि गुहागर तालुक्यातील अंगीकृत खासगी रुग्णालयांमध्ये ही कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.
महागड्या उपचारांसाठीही लाभ
या योजनेत हृदयरोग शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, बायपास, कर्करोग उपचार, डायलिसीस, मेंदू व मणक्याच्या शस्त्रक्रिया, हाडांच्या व नेत्र शस्त्रक्रिया, किडनी व लिव्हर विकार, जोखमीची प्रसूती, नवजात शिशू उपचार, डेंगी, मलेरिया, सर्पदंश, विंचूदंश यांसह तब्बल २,३९९ आजारांचा यात समावेश आहे. किडनी, लिव्हर आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपणासारख्या महागड्या उपचारांचाही लाभ मिळतो. रुग्णालयात दाखल झाल्यापासून ते डिस्चार्जपर्यंत खाट, डॉक्टरांचे शुल्क, तपासण्या, औषधे, आयसीयू, रक्त आणि भोजनाचा खर्च योजनेच्या पॅकेजमध्येच समाविष्ट आहे.









