जिल्ह्यातील सात तालुक्यांचे टंचाई आराखडे रखडले

रत्नागिरी:- यंदा पावसाचे प्रमाण पाहता जिल्ह्यात पाणीटंचाई लवकरच भेडसावण्याची शक्यता असल्याने डिसेंबरपूर्वी प्रत्येक तालुक्याचे टंचाई कृती आराखडे जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लांजा आणि संगमेश्वर या दोनच तालुक्यांचे आराखडे आतापर्यंत सादर झाले आहेत. उर्वरित तालुक्यांमधील टंचाईच्या बैठकाच झालेल्या नसल्याने जिल्ह्याचा एकत्रित पाणीटंचाई कृती आराखडा रखडण्याची चिन्हे दिसत आहेत.

जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण सन २०२२ पेक्षा किंचित जास्त असले तरी सप्टेंबरअखेरील पावसाने आपला गाशा गुंडाळला आहे. नोव्हेंबरमध्ये थंडी पडण्याऐवजी ऑक्टोबरचा उष्म्याचा कडाका डिसेंबरच्या मध्यानंतरही कायम आहे. सध्याचे वाढलेले तापमान पाहता जिल्ह्याला पाणीटंचाईला लवकर सामोरे जावे लागणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चिपळूण तालुक्यातील दोन गावांमध्ये तर पाणीटंचाई सुरू झाली आहे. मात्र, या तालुक्याचा अद्याप टंचाई कृती आराखडाच तयार झालेला नाही. त्याचबरोबर मंडणगड, दापोली, खेड, गुहागर आणि रत्नागिरी या तालुक्यांचेही पाणीटंचाई कृती आराखडे तयार झालेले नाहीत. केवळ दोन तालुक्यांचेच आराखडे आल्याने ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार करणार कसा, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यानेच तालुक्यांच्या बैठका झालेल्या नाहीत. त्यामुळेच टंचाई कृती आराखडे तयार झालेले नाहीत.