जिल्ह्यातील शाळांचे होणार सर्वंकष मूल्यांकन

रत्नागिरी:- विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या मूल्यांकनासाठी स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळांचे सर्वंकष मूल्यांकन करण्यात येणार आहे. यासाठी नवे सर्वसमावेशक मूल्यांकन प्रारूप विकसित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

शाळांचे मूल्यांकन कसे करावे, याबाबतचा सखोल अभ्यास करून त्याचे निकष आणि मानके निश्चित करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने राज्य सरकारकडे सादर केलेल्या अहवालात ही शिफारस केली आहे. यामुळे ‘नॅक’च्या धर्तीवर आता शाळांचेही ग्रेडेशन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शाळांचे मूल्यांकन आणि त्यांची गुणवत्ता व दर्जा निश्चित करण्यासाठी शाळेच्या वर्गखोल्यांसह, शैक्षणिक गुणवत्ता, उपलब्ध साधनसामग्री, विविध मूल्यांकन मॉडेल्समधील मुद्दे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदी आदी विविध मुद्यांचा विचार करणे आवश्यक आहे. या सर्व घटकांच्या मूल्यांकनासाठी प्रत्येकी दहा गुण दिले जावेत आणि गुणांच्या आधारे गुणानुक्रमे शाळांची वर्गवारी निश्चित करावी, अशीही शिफारस या अभ्यासगटाने केली आहे. या अभ्यासगटाने याबाबतचा अहवाल राज्याचे शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

गुणवत्ता आणि दर्जा ठरविण्यासाठी निश्चित केलेल्या सर्व मुद्यांचे मुद्दानिहाय मूल्यांकन करण्यासाठी सापेक्ष प्रतवारी प्रणाली विकसित करावी, या प्रणालीच्या माध्यमातून मुद्दानिहाय प्रत्येकी दहा गुणांपैकी उपलब्ध गुण निश्चित केले जावेत आणि या गुणांच्या सरासरीतून शाळांचे सर्वसमावेशक मूल्यांकन केले जावे. जेणेकरून मूल्यांकन पद्धती सीजीपीए म्हणजेच कम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट अ‍ॅव्हरेज, अशी ठरू शकेल, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.