जिल्ह्यातील निरक्षर व्यक्तींच्या सर्वेक्षणाची मोहीम 31 ऑगस्टपर्यंत चालणार

रत्नागिरी:- केंद्रशासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही मोहीम चालणार आहे.

शासनाच्या या कार्यक्रमांतर्गत साक्षरतेकडून समृद्धीकडे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एप्रिल 2022 ते मार्च 2027 या कालावधीत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. सद्यस्थितीत निरक्षरांची नावनिहाय माहिती उपलब्ध नसल्याने व 2011 च्या जनगणनेस 12 वर्षांहून अधिक काळ उलटला असल्याने त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ऑफलाईन पद्धतीने निरक्षरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

ही मोहीम 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. वय वर्षे 15 व त्यापुढील सर्व निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. निरक्षर व्यक्तींचा शोध घेताना ग्रामपंचायत तसेच शहरात प्रत्येक कुटुंबात घरोघरी जाऊन प्रत्यक्षात माहिती संकलन सुरू आहे.
एकही निरक्षर राहता कामा नये, अशा सूचना शासनाने प्रशासनाला दिल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी विविध स्तरीय समित्या नेमण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतील तर या समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, शिक्षणाधिकारी यांचा समावेश असणार आहे. तर तालुकास्तरीय समिती तहसीलदारांच्या आदेशाखाली असणार आहे.
गावस्तरीय समिती सरपंच, केंद्रस्तरीय समिती केंद्रप्रमुख व वॉर्डस्तरीय समिती, स्थानिक नगरसेवक यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे, अशी माहिती संबंधित विभागाने दिली.

निरक्षरांना साक्षर करण्यासाठी 2023 ते 2027 या पाच वर्षांचा कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. ‘नवभारत साक्षरता कार्यक्रम’ अंतर्गत निरक्षरांना साक्षर केले जाईल. त्यासाठी प्रत्येकी दहा व्यक्तींसाठी एक स्वयंसेवक नेमला जाणार आहे.