रत्नागिरी:- महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे विविध कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 3 शेतकर्यांचा समावेश आहे.
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2017 मधील सर्वसाधारण गटात हरिश्चंद्र धोंडु शिगवण (कुंभवे, साखळोली, ता. मंडणगड), वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2018 मध्ये सर्वसाधारण गटातून मिलिंद दिनकर वैद्य (केसपुरी, ता. रत्नागिरी), उद्यान पंडित पुरस्कार 2018 चा शेखर शिवाजीराव विचारे (वरवेली, ता. गुहागर) यांचा समावेश आहे. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2 मे रोजी सकाळी 11 वाजता तीन वर्षातील 198 पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे.
2017, 2018 आणि 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. राज्यात 198 जणांना पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार आहे. पुरस्कारार्थींना रोख रकमेसोबत स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) म्हणून कृषि विभागातील विविध योजनांमध्ये कार्य करणार असल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.