जिल्ह्यातील कोरोनास्थितीत कमालीची सुधारणा 

कोरोना संसर्ग आणि ऑक्सीजन व्याप्त खाटांचे प्रमाण घटले

रत्नागिरी:-ब्रेक द चेनच्या निकषानुसार तिसर्‍या आठवड्यातील चिंताजनक जिल्ह्यातील स्थिती सुधार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आणि ऑक्सीजन व्याप्त खाटांचे प्रमाण कमी झाले. मात्र निकषानुसार संसर्ग झालेल्यांची संख्या दहा टक्केपेक्षा अधिक असल्यामुळे जिल्हा चौथ्या टप्प्यातच राहील असा अंदाज बांधला जात आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणते निर्देश येतात याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य विभागाने जिल्ह्यातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला असल्याचे गुरुवारी (ता. 17) जाहीर केले होते. त्यामुळे इतर व्यावसायिकांना सवलत मिळेल अशी आशा होती. मात्र शुक्रवारी राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या निकषात जिल्ह्याचा आठवड्यातील पॉझिटिव्हिटी दर 11.90 टक्के दाखवला आहे. हा दर 10 टक्केपेक्षा वर राहिल्याने तिसर्‍या टप्प्यात येण्याचे स्वप्न अधुरे राहीले आहे. शासनाच्या निकषाप्रमाणे रत्नागिरी जिल्हा चौथ्या टप्प्यातच राहणार आहे. तिसर्‍या टप्प्यात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिक आणि व्यापार्‍यांनाही सवलत मिळाल्या असत्या. त्यांना शिथिलता मिळावी यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला काही सुचना दिल्या होत्या. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यावसायिकांना दिलासा मिळेल अशी शक्यता होती. परंतु शुक्रवारी जाहीर झालेल्या निकषांचा अडथळा त्यांना पार करावा लागणार आहे.

पॉझिटीव्हीटी दराप्रमाणे ऑक्सिजन व्याप्त बेडची टक्केवारी 42.19 आहे. हा जिल्हावासियांना दिलासा आहे. मागील महिन्यामध्ये ऑक्सीजन बेडचे प्रमाण 67 टक्केंवर पोचलेले होते. मृत्यूदरही 3.39 टक्केवर पोचला होता. दररोज 15 ते 20 मृतांच्या नोंद होत होत्या. वेळेत रुग्ण दाखल होऊ लागल्याने ऑक्सीजन पातळी कमी होणार्‍यांची संख्या घटली. शिथिलता देताना ऑक्सीजन व्याप्त बेडस् पन्नास टक्के कमी असल्याचा विचार प्रशासन करुन शकते. या आठवड्यात रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर दिला आहे. त्याची अंमलबजावणी सुरु असून दररोज चाचण्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तुलनेत कोरोना बाधितांचा आकडा पुर्वी एवढाच आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात निकषानूसार जिल्ह्याला सुट मिळेल अशी शक्यता आहे.