जिल्ह्यातील 2 हजार 130 शाळांमधील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर

रत्नागिरी:- लेटस् चेंज उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजार 130 शाळांमधील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर होणार असून राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. जिल्ह्यातील 64 हजार 967 विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे.

यावेळी प्रधान सचिव रणजितसिंग देओल, सहसचिव इम्तियाझ काझी, प्रकल्प संचालक रोहित आर्या यांच्यासह अनेक शाळांचे स्वच्छता मॉनिटर प्रतिनिधी उपस्थित होते.

अनोख्या अभियानाचे स्वरूप आतापर्यंत होत असलेल्या स्वच्छता अभियानापेक्षा वेगळे असल्यामुळे अनेक ठिकाणी कार्यशाळा होत आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छता मॉनिटर करण्यासाठी राज्यातील 64 हजाराहून शाळांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण़ पूजार यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत व जिल्हा समन्वयक मंजुशा पाध्ये यांनी प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्याची तयारी केली आहे. सध्या 2 हजार 130 शाळांमधील विद्यार्थी स्वच्छता मॉनिटर म्हणून नजर ठेवून या उपक्रमात उत्कृष्ट पध्दतीने सहभागी झाले आहेत. जिल्ह्यातील स्वच्छता मॉनिटर या उपक्रमांतर्गत येणारे अनुभव फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांवर व्हिडीओच्या माध्यमातून अपलोड करत आहेत. यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.