रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगरपंचायतींच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, यात सत्ताधारी महायुतीने आपला दबदबा निर्माण केला आहे. जिल्ह्यातील ४ नगरपालिकांवर शिवसेनेने (शिंदे गट) ताबा मिळवला असून, २ नगरपंचायतींमध्ये भाजपने यश संपादन केले आहे. तर राजापूरमध्ये काँग्रेसने आपला गड राखला आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तिन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. रत्नागिरी येथे शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांनी विजय मिळवत रत्नागिरीवर पुन्हा एकदा भगवा फडकवला आहे. चिपळूणात चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झाले आहेत. खेड येथे महायुतीच्या उमेदवार माधवी बुटाला यांनी दणदणीत विजय संपादन केला. लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेच्या सावली कुरुप यांनी विजयश्री खेचून आणली.
राजापूर नगरपालिकेत मात्र निकालाचे चित्र वेगळे पाहायला मिळाले. येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारत काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
नगरपंचायतींच्या निकालात भाजप आणि शिवसेनेने मिळून महायुतीची पकड मजबूत केली आहे. देवरुख येथे भाजपच्या मृणाल शेट्ये यांनी विजय मिळवला. गुहागरात ठिकाणी भाजपच्या नीता मालप नगराध्यक्ष पदी निवडून आल्या आहेत.









