तपासणीची धडक मोहीम ;आकस्मित भेटी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची आणि गर्भपात केंद्रांच्या केलेल्या तपासणीमध्ये २ गर्भपात केंद्रांमध्ये त्रुटी आढळुन आल्याने त्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांकडुन कारणे दाखवा नोटीस बजवण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्याती एक आणि गुहागर तालुक्यातील एका केंद्राचा समावेश आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे दर तीन महिन्याला होणाऱ्या तपासणीमध्ये हे पुढे आले आहे.
गर्भातील लिंग तपासणी आणि त्यानंतर वाढलेल्या बेकायदेशीर गर्भपातांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी शासनाने धोरण तयार केले आहे. त्यानुसार सोनोग्राफी केंद्राची आणि गर्भपात केंद्रांची पाहणी करून त्रुटी आढळलेल्या केंद्रावर कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात धडक मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील सोनोग्राफी सेंटर्स तसचे वैद्यकीय गर्भपात केंद्र याठिकाणी आकस्मिक भेट देऊन तपासणी करण्यात आली. यावेळी अर्जावर रुग्णाची सही आहे का, रेकॉर्ड व्यवस्थित ठेवले आहे का, आदीची पाहणी करण्यात आली. तसेच अवैध प्रकार घडल्यास त्या केंद्रावर पीसीपीएनडीटी कायद्याअंर्गत कारवाई करून प्रसंगी ते केंद्र सीलही करण्याचे अधिकार शल्य चिकित्सकांना आहेत.
जिल्ह्यात ११२ सोनोग्राफी सेंटर्स आणि १३२ वैद्यकीय गर्भपात केंद्र आहेत. ११ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत धडक मोहीम राबवुन त्यांची तपासणी करण्यात आली. मात्र दोन गर्भापत केंद्राच्या अहवालात त्रुटी असल्याचे तपासणीत आढळुन आले. त्यांना आरोग्य विभागाने तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.