जिल्ह्यात १० हजार ९५२ विद्यार्थी करणार शिक्षणाचा श्रीगणेशा

रत्नागिरी:- जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली आहे. इयत्ता पाचवी, आठवी तसेच नर्सरीची नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशाची माहिती व कागदपत्रांच्या देवाण-घेवाणीसाठी
शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे. परिसरातील शाळांच्या प्रवेशव्दारांवरच प्रवेश क्षमता, शाळेतील उपक्रम, सुविधांचे फलक झळकू लागले आहेत. जिल्ह्यात यावर्षी 10 हजार 952 विद्यार्थी पहिलीच्या वर्गात प्रवेशपात्र आहेत.

सध्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचे निकाल लागले असून, उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. विद्यार्थी व शिक्षक सुट्टीचा आनंद लुटत असले तरी कार्यालयीन कर्मचारी नवीन शैक्षणिक वर्षाच्या तयारीत व्यस्त आहेत. शैक्षणिक संकुलांना नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली आहे. शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांना आपापल्या स्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवण्याची मुभा दिल्याने शाळास्तरांवर नर्सरी ते आठवीपर्यंतची प्रवेश प्रक्रियाही सुरू आली आहे. शहरी भागातील शाळांमध्ये मिळणार्या भौतिक सोयी सुविधांची भुरळ विद्यार्थी व पालकांना पडत आहे. त्यामुळेच शिक्षणासाठी गावाकडून शहरात येणारे लोंढे वाढले आहेत. परिसरातील विविध शाळांमध्ये प्रवेशांसाठी माहिती घेण्यासाठी प्रवेश अर्जांच्या देवाण-घेवाणीसाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी होऊ लागली आहे. प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसोबत पालकांच्या विविध शंकांचे निरसन करताना कर्मचारी वर्गाची धांदल उडत आहे.

शिक्षण क्षेत्रातही व्यावसायिकीकरणाचा शिरकाव झाल्याने खासगी शाळांची संख्या वाढली आहे. सरकारी शाळांना स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण झाल्याने आपल्या शाळेत प्रवेश जास्त कसे होतील यासाठी शिक्षक प्रयत्नशील आहेत. त्यासाठी स्थानिकस्तरावर शिक्षकांकडून गृहभेटी व पालकांशी संपर्क साधून प्रवेश प्रक्रियेची माहिती दिली जात आहे.