जिल्ह्यात १ लाख १३ हजार जणांनी काढले आयुष्यमान कार्ड

रत्नागिरी:- प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत साडेतीन लाखांपर्यंत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत दिड लाखांपर्यंत मोफत उपचारांची सुविधा राज्यशासनाने करुन दिली आहे. त्यासाठी आयुष्यमान कार्ड काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेचे ४ लाख १ हजार ४५१ लाभार्थी आहेत. त्यापैकी १ लाख १३ हजार ८४३ जणांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे.

केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत ३.५० लाखांपर्यंत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १.५० लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळत आहे. शासनाने सर्वच रेशन कार्डधारकांना पाच लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेतला असला, तरी अजूनही याबाबत अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सध्या १ लाख रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,१३,८४३ जणांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे. हे कार्ड न काढल्यास भविष्यात धान्य मिळण्यात अडचणी येऊ शकतात. आयुष्मान कार्डसाठी सध्या जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ४५१ नागरिक पात्र ठरले आहेत. त्यांना हे कार्ड काढण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. आयुष्यमान योजनेसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यातील १,१३,८४३ नागरिकांनी आयुष्यमान योजनेचे कार्ड काढले असल्याने त्यांना लाभ मिळणार आहे. आयुष्यमान योजनेचे कार्ड काढण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. ज्यांची नावे सामाजिक-आर्थिक जनगणनेच्या यादी (एसईसीसी २०११) मध्ये नोंदविली गेली आहेत, अशा शहरी व ग्रामीण कुटुंबातील लोकांना लाभ मिळत आहे. आयुष्यमान कार्ड असलेल्या नागरिकांना मोफत उपचारांचा दिले जातात. शासनाने दारिद्र्य रेषेखालील तसेच आर्थिक दुर्बल या घटकांसाठी ही योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.