जिल्ह्यात श्रमदानातून १ हजार १६७ बंधारे उभारणी 

रत्नागिरी:- पाऊस लांबल्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहीम प्रत्यक्षात राबविण्यास उशीर झाला. तरीही डिसेंबर अखेरीस रत्नागिरी जिल्ह्यात १,१६७ बंधारे श्रमदानातून उभारण्यात यश आले आहे. त्यामुळे सिंचनासह विहिरीची पाणीपातळी वाढण्यास मदत होत आहे.

प्रत्येक ग्रामपंचायतीने १० बंधारे बांधण्याचे लक्ष्य जिल्हा परिषद कृषी विभागाकडून गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. यंदा पावसाळी हंगाम लांबल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत नद्या, नाल्यांमधील वाहणाऱ्या पाण्याचा जोर अधिक होता. जिल्ह्यात यंदा प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाला. अति पर्जन्यमानाचा जिल्हा असूनही नद्यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. तसेच एप्रिलपासून पाणी टंचाईला सुरुवात होते. त्यावर उपाय म्हणून गावागावातील छोट्या नद्या, नाले यांचे पाणी अडवून ते जिरवले तर त्याचा उपयोग होऊ शकतो. हे पाणी शेती आणि गुरांना पिण्याकरिता, बोअरवेल व विहिरीची पाण्याची पातळी वाढविण्याकरिता होते. पाणी अडवण्यासाठी तात्पुरते कच्चे, वनराई व विजय बंधारे बांधल्यास लाखो लीटर पाणी साठवता येते. तसेच टंचाई काळात पाण्याचे दुर्भिक्षही टाळता येते. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये हा प्रयोग यशस्वी झालेला आहे. यंदाही त्यादृष्टीने जिल्हा परिषद कृषी विभागाने नियोजन केले. त्यात यश आले असून आतापर्यंत मोठ्याप्रमाणात बंधारे बांधण्यात यश आले आहे.

जिल्ह्यात ८४५ ग्रामपंचायती असून, आतापर्यंत १,१६७ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यात २४९ वनराई, ३४४ विजय तर ५७४ कच्च्या बंधाऱ्यांचा समावेश आहे. यासाठी लागणारे साहित्य ग्रामपंचायतींनी लोक सहभागामधून जमा केले आहे. श्रमदानातून हे बंधारे बांधले जात असल्याने लाखो रुपयांची बचत झाली आहे. या बंधाऱ्यांमध्ये लाखो लीटर पाणी साठले आहे.