रत्नागिरी:- कोरोना बाधित कमी झाल्यामुळे पहिली ते चौथीचे वर्गही सुरु करण्यास शासनाने अनुमती दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एक हजार शाळांमधील सुमारे ७५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष अध्यापन १ डिसेंबरपासून सुरु होत आहे. बंद शाळांमधील किलबिलाट सुमारे दोन वर्षांनी सुरु होणार आहे. मुलांना शाळेत पाठविण्यापुर्वी पालकांची संमती अत्यावश्यक करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात ८ वी ते १२ वीचे वर्ग १० ऑगस्टपासून सुरु करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण भागात पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु केले. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने बंद असलेल्या पहिली ते चौथीच्या शाळांही सुरु करण्यास मान्यता दिली आहे. शाळा सुरु करण्यापुर्वी कोरोना संसर्गापासून विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. सोेमवारी (ता. २९) याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात केली जाणार आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून गटशिक्षणधिकार्यांना सुचना दिलेल्या आहेत. पालकांच्या बैठका घेऊन शाळा उघडण्यास सांगण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापन समितीशी चर्चा करुन शासनाच्या आदेशाचे काटेकोरपण पालन करावयाचे आहे. तालुकापातळीवर कार्यवाही केली जात आहे. व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने काही जिल्हा परिषद शाळांच्या कामकाजाला आरंभ झाला आहे. रत्नागिरी, चिपळूणसह जिल्ह्यातील शहरी भागातील प्राथमिक शाळांचे वर्ग बंदच होते. शासनाच्या आदेशानंतर पालकांच्या संमतीने हे वर्गही सुरु होत आहेत. दरम्यान, कोरोनामुळे शाळा बंदच असल्याने पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाळेत प्रवेशच केलेला नव्हता. हे विद्यार्थी शाळांचा अनुभव घेणार आहेत.
या सुचनांचे पालन अत्यावश्यक
शाळा निर्जंतुकीकरण करणे, हात धुण्यासाठी व्यवस्था करणे, तापमापक उपलब्ध करुन देणे, वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्या वाहनांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे, शिक्षकांची शाळेत जाण्यापुर्वी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक केले आहे. दोन लस घेतलेल्या शिक्षकांसह कर्मचार्यांना शाळेत प्रवेश द्यावा. बैठक व्यवस्था करताना एका बाकावर एक विद्यार्थी, दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर, मास्क अत्यावश्यक, थुंकण्यावर बंदी, शाळेतील कार्यक्रमांवर बंधने, विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापुर्वी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असणार आहेत.