Monday, July 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

जिल्ह्यात मंगळवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसाच्या ‘रेड अलर्ट’मुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनुज जिंदल यांनी एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या म्हणजेच मंगळवार, दिनांक ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, ७ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची तीव्र शक्यता आहे. जिल्ह्यात आधीच अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, खेड तालुक्यातील ‘जगबुडी’ नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या हेतूने प्रशासनाने हा खबरदारीचा निर्णय घेतला आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.