Friday, October 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी जिल्ह्यात भूजल पातळी ५.२२ मीटरने घटली

जिल्ह्यात भूजल पातळी ५.२२ मीटरने घटली

१८३ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट

रत्नागिरी:- कोकणात यंदा पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाईचे संकट १८३ गावांवर आतापासूनच गडद होऊ लागले आहे. पावसाळा संपताच नदी-नाले, ओढे-वहाळ आणि विहिरींच्या पाणीपातळीत घट होऊ लागल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरांनाही पाणी जपून वापरण्याची वेळ आली आहे.

रत्नागिरी शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, दापोलीत जलस्रोत आटण्याची चिन्हे दिसत आहेत. राजापूरमध्येही संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी वनराई बंधारे उभारण्यावर भर दिला जात आहे. भूजल पातळीतील मोठी घट आणि आगामी उन्हाळ्याची चाहूल यामुळे जिल्ह्याचे पाणी नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

भूजल सर्वेक्षणाच्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी ५.२२ मीटरपर्यंत घट नोंदवण्यात आल्याचे वृत्त आहे. राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यांमध्ये ही घट विशेष चिंताजनक आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जमिनीत पुरेसे पाणी मुरले नाही. परिणामी, विहिरी, कूपनलिका आणि भूजल स्रोतावरील ताण वाढला आहे. आगामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना अधिक कसरत करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

रत्नागिरी शहरात संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन नगरपालिकेने सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नियमित पाणीपुरवठा करण्याच्या वेळेतही कपात करण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर लगेचच पाणीपुरवठ्याबाबत निर्बंध घालावे लागत असल्याने जलसोतांवरील ताण स्पष्ट झाला आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दापोली तालुक्यात पावसाने लवकर निरोप घेतल्याने नद्या, ओढे आणि विहिरींची पाणीपातळी झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी लहान बंधारे उभारणे, विहिरींचे पुनर्भरण करणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसर वापर करणे आवश्यक ठरत आहे.