रत्नागिरी:- कमाल तापमानात घट झाली असताना पूर्वमोसमी पावसाला पोषक वातावरण तयार झाले असल्यामुळे आगामी दोन दिवस कोकण किनारपट्टी भागासह मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
गेले दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात मळभयुक्त वातावरणाने उष्ण आणि दमट हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. गेले दोन दिवस तापमानात घट झाली असली तरी दमट हवामानामुळे उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सोमवारी जिल्ह्यात 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दुपारी त्यामध्ये 1 ते 2 अंशसेल्सिअसने वाढ झाली. त्यामुळे कोकण किनारपट्टी भागात पूर्व मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
पूर्वमोसमी सरींच्या पोषकतेत रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात किनारपट्टीलगत ताशी 30 ते 40 कि. मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात वादळी पावसाची शक्यता आहे. प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदर्गात वादळी पावसाच्या शक्यतेने प्रशासनानेही सावधगिरीच्या आणि सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत.