रत्नागिरी:- प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला नसला तरीही शाळा व्यवस्थापन समित्यांच्या सकारात्मकेतमधून काही गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु करण्याच्या हालचालींना वेग आला. प्रशासनानेही लेखी आदेश नसले तरीही सध्या पालकांकडून संमत्तीपत्र गोळा करण्यात येत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी आहे; मात्र अजुनही दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना शाळा सुरु करण्याबाबत अट्टाहास का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोरानाची लाट ओसरल्यानंतर मागील शैक्षणिक सत्रापासून बंद ठेवण्यात आलेल्या शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु झाले. 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांना हिरवा कंदिल मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातील 458 पैकी 358 शाळा सुरु झाल्या आहेत. एकुण 83 हजार 136 विद्यार्थ्यांपैकी 26 हजार जणं प्रत्यक्ष शाळेत येऊन शिक्षण घेत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील शाळांची संख्या सर्वाधिक असून शहरी भागात याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. पालक कोरोनाच्या भितीने मुलांना शाळेत पाठवण्यास सकारात्मक नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळांची स्थिती गंभीर असतानाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील वर्ग भरण्यासाठी पावले उचलली जात आहेत. जानेवारी महिन्यात 5 ते 8 वीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यात येतील अशी शक्यता आहे. परंतु तसे आदेश शासनाकडून आलेले नाहीत. तरीही रत्नागिरीत प्राथमिक शाळांचे वर्ग सुरु करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. शिक्षण विभागाकडून लेखी आदेश नसले तरीही तशा तोंडी सुचना दिल्याचे पुढे येत आहे. काही शाळांनी सोमवारपासून वर्ग भरण्याचे नियोजनही केले आहे. त्यासाठी सध्या पालकांकडून संमत्तीपत्र घेतली जात आहेत. राज्यात कुठेही प्राथमिक शाळा सुरू नाहीत; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात शाळा सुरू होणार आहेत. जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळांमधील शिक्षक कोरोना बाधित सापडले आहेत. सध्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी आहे. शनिवारी (ता. 19) 30 नवीन बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे. अशीच स्थिती राहीली तर प्राथमिक शाळा सुरु करणे अडचणीचे ठरेल अशी चर्चा आहे.
दरम्यान, सोमवारी (ता. 21) सुरु होणार्या शाळांचे नियोजन झाले आहे. सोमवारी सकाळी 10.30 ते 12.30 इयत्ता पाचवी ते तिसरी, मंगळवार पाचवी ते सातवी, बुधवार पाचवी ते दुसरी, गुरूवार पाचवी ते चौथी, शुक्रवारी पाचवी ते पहिली, शनिवारी सातवी ते सहावी सकाळी 8 ते 10 असे नियोजन करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.