रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र व्हावे, यासाठी जिल्ह्यात दर्जेदार प्रकल्पांना सिंधुरत्न योजनेतून अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर रेल हॉटेल, टर्मिनस इमारत आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे.
त्यानुसार महत्त्वाच्या पर्यटन केंद्र प्रकल्पांचे आराखडे व रेखाचित्रेही तयार करण्यात आली आहेत. याशिवाय राजापूर, संगमेश्वर, लांजा आदी तालुक्यात असलेल्या धबधब्यांबाबत असलेल्या असुविधांचाही सर्व्हे करण्यात आला आहे. तसेच मंडणगड, खेड, चिपळूण येथील बॅक वॉटर्स प्रकल्पाबाबत पर्यटनासाठी सुविधा निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
या योजनांचा समावेश सिंधुरत्न योजनेत करण्यात आला आहे. तसेच सिंधुरत्न योजनेतून पर्यटन केंद्रावर पाच रूमच्या रिसॉर्टला मान्यता देण्याचे ठरविण्यात आले. टेन्ट प्रकल्प देखील मंजुरीसाठी आले आहेत. त्यांचाही या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. अशा योग्य प्रकल्पांना दर्जेदार पर्यटनासाठी मान्यता दिली जाईल. तसेच स्थानिकांची गुंतवणूक या योजनेत घेताना त्यांचाही सहभाग घेतला जाणार आहे.
साहित्यिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गावांना पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार आहे. या ठिकाणी पर्यटनाची गर्दी वाढेल, वाचन संस्कृती वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी पुस्तके, कविता, काही पुस्तकांचे मराठी भाषांतर सुद्धा करून ठेवण्याचा विचार असून पर्यटन प्रकल्पाला साहित्याची पर्वणी देखील त्याद्वारे मिळणार आहे.









