जिल्ह्यात दोन महिन्यात डेंग्यूचे २४ रुग्ण

रत्नागिरी:- उन-पावसाचा खेळ सुरु झाला असून डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण आहे. जुन आणि जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात 24 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर खेड शहरात सुमारे 25 संशयित डेंग्यु बाधित असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

मुसळधार पावसाचा जोर ओसरला असून श्रावणधारा सुरु झाल्या आहेत. गेल्या चार दिवसात एखादी सर दिवसातून पडून जात आहे. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचून राहत आहे. रात्री पाऊस आणि दिवसा उन अशी स्थिती जिल्ह्यात सर्वत्र आहे. पाणी साचून राहिलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासंची उत्पत्ती होते. डेंग्यू हा संसर्गजन्य रोग असून एडिस इजिप्ती या डासामुळे होतो. राज्यात सर्वत्रच या डेंग्युचे रुग्ण आढळत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्यात 16 तर जुलै महिन्यात 8 डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर मलेरियाचा जुलै महिन्यात 1 रुग्ण सापडला होता. डेंग्युचे रुग्ण सापडू लागल्यानंतर आरोग्य विभागाकडून सतर्कतच्या सुचना देण्यात आल्या आहेत. बराच काळ पाणी साचुन राहत असलेल्या ठिकाणी स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खेड येथील नगरपालिकेच्या हद्दीमध्ये गेल्या एक महिन्यापासून डेंग्यू सदृश रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत सुमारे 25 जणांची नोंद झाली आहे. ते येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाने खेड शहरात 17 पथके सर्व्हेक्षणासाठी नेमली आहे. सध्याचे वातावरण या डासांना पोषक असून आजूबाजूला पाणी जमा होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी केले आहे.