रत्नागिरी:- गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर साथींच्या आजारांना प्रतिबंध होण्यासाठी गेल्या चार दिवसांत गावाकडे येणार्या चाकरमान्यांची आरोग्य पथकांकडून मुंबई-गोवा महामार्गावर तपासणी करण्यात आली. यामध्ये 248 इतके चाकरमानी आजारी असल्याचे आढळून आले. या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
गणशोत्सवासाठी गावी येणार्या चाकरमान्यांच्या दिमतीला मुंबई-गोवा महामार्ग असेल व अन्य महामार्गावर जिल्हा आरोग्य विभागाने आरोग्य तपासणी केंद्र उभी केली आहेत. जिल्ह्यात 3 सप्टेंबरपासून ही पथके तैनात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व महामार्गावर वैद्यकीय तपासणी व माहिती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. त्याद्वारे चाकरमान्यांची आरोग्य तपासणी व त्यांना प्रतिबंधात्मक उपचार तसेच खबरदारीविषयक मार्गदर्शन केले जात आहे. त्याठिकाणी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्यांमार्फत चाकरमान्यांच्या वाहनांची चौकशी करुन त्यांच्या आजारासंबंधी विचारपूस केली जात आहे.
सध्या पाऊस सुरू झाला आहे. तर काहीवेळा ऊन – पावसाचा खेळ असल्याने वातावरणात बदल झाला आहे. याचा फटका आरोग्यावर होत असून सध्या जिल्ह्यात सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया याची साथ आली आहे. साथीच्या पार्श्वभूमीवर येणार्या चाकरमान्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे.
जिल्ह्यात 22 ठिकाणी आरोग्य पथके तैनात करण्यात आली असून आतापर्यंत 2 हजारांपेक्षा जास्त चाकरमान्यांची तपासणी करण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत ही आरोग्य पथके तैनात असणार आहेत. यामध्ये 5 सप्टेंबर रोजी केलेली तपासणी 35 तापाचे व इतर 6, 6 सप्टेंबर रोजी 39 तपाचे, 17 इतर, 7 सप्टेंबर रोजी 33 तपाचे, 23 इतर, 8 सप्टेंबर रोजी 31 तापाचे, 18 इतर, 9 सप्टेंबर रोजी 30 तापाचे, 16 इतर असे एकूण सर्दी, खोकला, तापाचे 168 तर 80 इतर असे एकूण 248 जण आजारी सापडले. या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
खेडमध्ये पाच ठिकाणी ही पथकं असणार आहेत. हॉटेल अनुसया, हॅप्पी धाबा, भोस्ते घाट, भरणे नाका, खेड रेल्वे स्टेशन, चिपळूण : सवतसडा पेढे, कळंबस्त फाटा, बहाद्दूरशेख नाका, अलोरे घाटमाथा, सावर्डे, चिपळूण रेल्वे स्टेशन, संगमेश्वर : आरवली, संगमेश्वर एसटी स्टॅण्ड, वांद्री, मुर्शी, संगमेश्वर रेल्वे स्टेशन, रत्नागिरी : हातखंबा तिठा, पाली, रत्नागिरी रेल्वे स्टेशन, लांजा : वेरळ, कुवे गणपती मंदिर, राजापूर : जकातनाका असे एकूण 22 ठिकाणी पथकं तैनात करण्यात आली आहेत.









