रत्नागिरी:- जिल्ह्यातील सर्व शहरांसह ग्रामीण भागातील वेगवेगळ्या रस्त्यांची वाढती लांबी किंवा त्यांचे जाळे विकासाचा मार्ग प्रशस्त करताना दिसून येत आहेत. गेल्या 10 वर्षात सर्व प्रकारच्या रस्त्यांची लांबी तब्बल 3 हजार 96 कि.मी. ने वाढली आहे. यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग, इतर जिल्हामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांचे 3 हजार 76 कि .मी. लांबीचे योगदान आहे.
कोणत्याही जिल्ह्यात होणार्या रस्त्यांमुळे गाव, वाड्या, वस्त्या परस्परांना जोडल्या जातात. ज्यातून फळं – कृषी उद्योग, व्यापार, पर्यटन वृद्धी होऊन रोजगार निर्मितीला चालना मिळते. त्यामुळेच रस्त्यांच्या विकासाने तेथील जनतेचा धनवान विकास होतो. याची अनुभूती रत्नागिरी जिल्ह्यातही येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नोंदीनुसार दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील एकूण रस्त्यांची लांबी 7 हजार 457 कि.मी. इतकी होती. यामध्ये 5 हजार 733 कि.मी. चे रस्ते डांबरी आणि 1 हजार 446 कि.मी. चे रस्ते खडीचे होते. त्याचबरोबर डांबर, खडी व्यतिरीक्त इतर माल वापरून किंवा अपृष्ठांकीत रस्त्यांची लांबी 271 कि.मी. इतकी होती.
सन 2020-21 नुसार हिच रस्ता लांबी आता 10 हजार 553 कि.मी. इतकी झाली आहे. यामध्ये 8 हजार 334 कि.मी. चे रस्ते डांबरी आणि 1 हजार 581 कि.मी. चे रस्ते खडीचे झाले आहेत. अपृष्ठांकित रस्त्यांची लांबीसुद्धा वाढली आहे. ही अपृष्ठाकित रस्त्यांची लांबी 638 कि.मी. इतकी झाली आहे. रस्ते सुस्थितीत झाल्यानंतर वाहनांमधून होणारा प्रवास स्वस्त आणि सुखरुप होत आहे. त्याचबरोबर खराब रस्त्यांमुळे वाहनांमध्ये होणारा बिघाडही कमी होत गेला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 9 तालुके असून या सर्वच तालुक्यांमध्ये प्रसिद्ध यात्रास्थळे, ऐतिहासिक, सांस्कृतिक, निसर्गरम्य स्थळांसह घाट, किल्ले, धबधबे, कातळशिल्पे, लेणी, स्मारके, गरम पाण्याचे झरे अशी 80 पेक्षा अधिक ब आणि क वर्गातील पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये गणपतीपुळे, पावस, वेळणेश्वर, पन्हाळेकाजी, थिबा पॅलेस, माचाळ ही ‘ब’ वर्गातील पर्यटनस्थळे आहेत. ही सर्व पर्यटनस्थळे अर्थसंकल्पीय तरतुदीतून विकसीत होत असतात. अशाच माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले जात आहेत. राष्ट्रीय महामार्ग, प्रमुख राज्यमहामार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते असे वेगवेगळे रस्ते आहेत. यामधील इतर जिल्हामार्ग, ग्रामीण रस्ते करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेकडे असते. प्रमुख जिल्हामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात सन 2009-2010 मध्ये प्रमुख जिल्हारस्ते 1 हजार 424 कि.मी. चे होते, ते आता सन 2020-21 च्या नोंदीनुसार 1 हजार 839 कि.मी. लांबीचे झाले आहेत. इतर जिल्हा मार्ग 2009 -2010 मध्ये 1 हजार 294 कि.मी. चे होते, ते आता 1 हजार 792 कि.मी. चे झाले आहेत. ग्रामीण रस्त्यांमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे.
सन 2009 -10 मध्ये 3 हजार 405 कि. मी. चे असणारे रस्ते आता 5 हजार 568 कि. मी. लांबीचे झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील सर्वाधिक 1 हजार 235 कि.मी. चे रस्ते डांबरी आहेत. पाठोपाठ खेड (1 हजार 166 कि.मी.), संगमेश्वर ( 1 हजार 154 कि.मी. ), चिपळूण ( 1 हजार 115 कि.मी.), राजापूर (1 हजार 104 कि.मी.),दापोली ( 900 कि.मी.), गुहागर (644 कि.मी. ), लांजा(609 कि.मी.) आणि मंडणगड तालुक्यातील 407 कि.मी. चे रस्ते डांबरी आहेत. दरम्यान सिमेंट -काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये केवळ गुहागर (11 कि.मी). लांजा (6 कि.मी.), दापोली (3 कि.मी.), आणि संगमेश्वर ( 3 कि. मी.) तालुक्यांचा समावेश आहे.
खडीच्या रस्त्यांची लांबी 1 हजार 581 कि.मी. इतकी आहे. यामध्ये संगमेश्वरात 278 कि.मी., रत्नागिरीत 238 कि.मी., गुहागर 230 कि.मी., लांजा 210 कि.मी, राजापूर 176 कि.मी., दापोली 169 कि.मी, खेड 119 कि.मी, चिपळूण 111 कि.मी., तर मंडणगड तालुक्यात 50 कि.मी. लांबीचे रस्ते खडीचे झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग 331 कि.मी. चा आहे. प्रमुख राज्यमहामार्ग 249 कि.मी.तर राज्यमहामार्ग 774 कि.मी. चा आहे. राष्ट्रीय महामार्ग 10 वर्षांपूर्वी 275 कि.मी. चा होता. या काळात राज्य महामार्ग आणि प्रमुख राज्य महामार्ग एकत्रितपणे मोजले जात होते. त्यावेळी ती लांबी 857 कि.मी. इतकी होती.