रत्नागिरी:- मागील पंधरा दिवसात जिल्ह्यातील कमाल पारा 32 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान तर किमान पारा 24.9 अंशापर्यंत आल्यामुळे नागरिकांना पहाटेच्या सत्रातही उष्म्याची झळा सहन कराव्या लागत आहेत. होळीनंतर उन्हाची तिव्रता अधिक वाढेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मार्च महिन्यात सुरवातीला उन्हाचा कडाका वाढला होता. त्यानंतर कमाल तापमान 31 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके होते. 18 मार्चला पारा 32.2 अंशावर गेला. किमान तापमानही 22.3 अंश इतके नोंदले गेले. 20 आणि 21 मार्चला कमाल तापमान अनुक्रमे 33.9 आणि 35.0 अंश इतके होते. त्यानंतर कमाल तापमान 32 ते 33 अंश इतके होते. तेव्हा किमान तापमान 22 अंशावर पोचले. पुढील पाच दिवस तापमान 24.1 ते 24.9 अंशापर्यंत होते. मागील पंधरा दिवसात किमान तापमानात झालेल्या बदलामुळे रात्री थंडीऐवजी उष्मा जाणवत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. कोकण कृषी विभागाच्या अंदाजानुसार 2 एप्रिलपर्यंत कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअस दरम्यान राहिल तर किमान तापमान 24 ते 25 अंशापर्यंत असेल. पुढे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवेत उष्मा जाणवत असल्यामुळे त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम जाणवत आहे. उष्माघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य विभागाकडून ग्रामीण भागात सतर्कतच्या सुचना दिल्या आहेत. उन्हाचा त्रास झालेल्या रूग्णासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कक्ष सुरु करण्याची सुचना जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.