जिल्ह्यात जूनअखेर डेंगीचे सात रुग्ण

रुग्णांच्या प्रमाणात घट; आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर उपाययोजना

रत्नागिरी:-  जिल्ह्यात डेंगीचे रुग्ण वाढू नयेत यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. त्यामुळे यावर्षी डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहेत. जूनअखेर केवळ ७ रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या २५६ होती.

पावसाळा सुरू झाला आहे तसेच हवामानातील सतत बदल, वातावरणातील बदल यामुळे तालुक्यात डेंगीचा धोका निर्माण झाला आहे. डासांमुळे डेंगीची लागण होण्याचा धोका आहे. हा धोका ओळखून आरोग्य विभागाने जानेवारीपासून जूनपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उपाययोजना राबवल्या आहेत. त्यामुळे यंदा डेंगीचे रुग्ण कमी झाले आहेत. याबाबत माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव म्हणाले, डासांमुळे पसरणारा विषाणूजन्य रोग आहे. संक्रमित डास चावल्यास विषाणू त्याच्या शरीरात प्रवेश करतो आणि यातून डेंगीचा संसर्ग होतो. त्यामुळे पांढऱ्‍या पेशी कमी होण्याचा धोका कायम असतो. उच्चताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना, मळमळ, उलट्या, त्वचेवर पुरळ आणि थकवा ही डेंगीची लक्षणे आहेत. सध्या पावसाळी हंगाम सुरू झाला आहे. ठिकठिकाणी पाणी साचले जात आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे त्यामुळे आम्ही नागरिकांमध्ये प्रथम जनजागृती केली. ज्या भागात डेंगीचे रुग्ण आढळतात त्या भागात औषध फवारणी केली. आदिवासी भागात डेंगीचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त आहे. चिपळूणमध्ये दरवर्षी डेंगीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळतात. आदिवासी भागात डेंगीचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याच ठिकाणी जनजागृती केली आहे.

चौकट १
डासमुक्तीसाठी ‘ऑइल बॉल’ संकल्पना
ठिकठिकाणी औषध फवारणीबरोबरच ऑइल बॉल ही संकल्पना राबवली आहे. त्यात एका बॉलमध्ये ऑइल टाकले जाते. तो बॉल पाण्यात टाकल्यानंतर ऑइल पसरते आणि पाण्यात असलेले डेंगीचे जिवाणू अंडी मरतात. त्यामुळे हा रोग पसरत नाही. डासांपासून मुक्ती मिळावी यासाठी अनेकजण आपापल्यापरिने प्रयत्न करत आहेत. तरीही सायंकाळी व पहाटेच्यावेळी डासांचे संकट ग्रामीण भागासह शहरी भागात सुरू आहे. या डासांच्या दंशामुळे तापाची साथ वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.