जिल्ह्यात चारच ठिकाणी वाजली शाळेची पहिली घंटा

223 विद्यार्थ्यांची उपस्थिती

रत्नागिरी:-शासनाने कोरोना नसलेल्या गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन तालुक्यातील चार शाळांमध्ये 223 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. कोरोनाचे निकष पाळून पालकांच्या संमतीपत्रानंतर या ठिकाणी शाळेंची पहिली घंटा वाजली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये रत्नागिरीचा समावेश असल्यामुळे मुलांना शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

कोरोनामुक्त गावात 15 जुलैपासून शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते. त्यासाठी शाळा स्तरावर सरपंच, तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या संयुक्त समितीने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून चर्चेतून निर्णय घेत ठराव मंजूर करुन कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी त्या गावात किमान एक महिना तरी कोरोना रूग्ण आढळून येता कामा नये, ही महत्त्वपूर्ण अट होती. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण विभागाकडून सुचना देण्यात आल्या होत्या. पहिल्या दिवशी राजापूर आणि दापोली या तालुक्यातील प्रत्येकी दोन शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाली आहे. माध्यमिकच्या जिल्ह्यात एकुण 465 शाळा असून त्यात 1 लाख 925 विद्यार्थी आहेत.

पहिली लाट ओसरल्यानंतर शाळेतील प्रत्यक्ष अध्यापन सुरु करण्याला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता; मात्र दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात अधिक बाधित सापडत असल्याने अजुनही भितीचे वातावरण कायम आहे. जिल्ह्यात दिवसाला तीनशे ते चारशेच्या दरम्यान कोरोना बाधित सापडत असून कोरोनामुक्त गावांची संख्या 849 आहे. एकही बाधित नसलेल्या गावांची संख्या चांगल्या प्रमाणात असली तरीही कमी पटांच्या शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनोचे नियम पाळणे शक्य आहे; मात्र शहरातील माध्यमिक शाळांना नियोजन करावे लागणार आहे.