युतीसह आघाडीला बंडखोरीची लागण
रत्नागिरी:- जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी असल्यामुळे बुधवारी अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना-भाजप युतीसह महाविकास आघाडीतही ताळमेळ नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. खेडमध्ये शिवसेनेचा एकला चलोरेचा नारा आहे. आज अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी 226 तर पंचायत समितीच्या ११२ जागांसाठी 444 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.
तालुक्याच्या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी होती. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर तालुक्यात शिवसेना-भाजप आघाडी जवळजवळ निश्चित झाल्याचे चित्र आहे. खेड तालुक्यात भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. याठिकाणी नगरपालिकेचीच री पुन्हा ओढली गेली असून मंत्री योगेश कदम यांनी युतीसाठी आपण आग्रही असल्याचेच जाहीर केले आहे.
रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना-भाजप युतीचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला असला तरीही जिल्हा परिषदेसाठी एकही जागा नसल्याने भाजपत कुरबुरी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवारी न मिळाल्याने शिंदे शिवसेनेकडून माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी बंडाचा झेंडा फडवकवला आहे. चिपळूणमध्ये ३ जिल्हा परिषद गटात भाजप-शिवसेना (शिंदे) आमनेसामने येणार आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि काँग्रेसकडूनही शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीतही आलबेल नसल्याचे पुढे आले आहे. मंडणडगमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे चार पक्ष एकत्र आल्यामुळे भाजप, शिंद शिवसेनेपुढे आव्हान निर्माण झालेले आहे.









