रत्नागिरी:- रत्नागिरी महाराष्ट्र शासनाच्या 15 मार्च 2024 च्या संचमान्यता विषयक निर्णयाविरोधात तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या समन्वय समितीने आज 5 डिसेंबर रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आणि आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणूक आचारसंहितेमुळे त्या मोर्चावर बंधने आली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मोर्चा पूर्वनियोजनामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा बंद राहण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.
शासनाच्या संच मान्यतेच्या निर्णयामुळे विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे दोन हजार शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. तर खेड्यातील 1 ते 5 च्या शाळा बंद होतील किंवा एक शिक्षकी होतील. तर 1 ते 8 च्या बहुतांश शाळा द्विशिक्षकी होतील. याचा थेट परिणाम गोरगरीब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर होणार आहे.
त्यामुळे शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये 15 मार्च 2024 चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा आणि त्यानुसार समायोजन प्रक्रियेस तात्काळ स्थगिती आदेश द्यावेत. टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी आणि टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ लावून सुरू असलेली कार्यवाही तात्काळ थांबवावी. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी. प्राथमिक शिक्षकांना 10, 20, 30 वर्षानंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अशा मागण्या आहेत.
या मागण्या शासनाने त्वरित मान्य करण्याची मागणी आहे. त्यासाठी आज 5 डिसेंबर रोजी राज्यभर शाळा बंद ठेवून जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन करण्याचा निर्णय राज्य समन्वय मोर्चा घेतला आहे. त्यासाठी माळनाका शिर्के हायस्कूल, रत्नागिरी ते जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी असा सकाळी 11 ते 4 या वेळात मोर्चा काढण्याबाबत नियोजनही करण्यात येउन प्रशासनाला निवेदन सादर करण्या निर्णय घेण्यात आला होता.
शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यभरातील शिक्षक आंदोलन करतील आणि त्यानंतर मुंबई येथे मोठे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्या इशारा देण्यात आला आहे.
आज शुक्रवारी होणाऱ्या या आंदोलनात समन्वय समितीने शिक्षण सेवकांसह जिल्ह्यातील सर्व 100 टक्के शिक्षक बंधू-भगिनींनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार या आंदोलनात सहभागी संघटनामध्ये रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीमध्ये म.रा. प्राथमिक शिक्षक समिती, म.रा. प्राथमिक शिक्षक संघ, अखिल भा. शिक्षक संघ, म.रा. पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख सभा, म.रा. कास्ट्राईब शिक्षक संघटना, म.रा. शिक्षक परिषद, म.रा. जुनी पेन्शन संघटना, दिव्यांग कर्मचारी संघटना, म.रा. पुरोगामी प्रा. शिक्षक समिती, म.रा. उर्दू शिक्षक संघटना, अ.भा. उर्दू शिक्षक संघ, म.रा. जुनी पेन्शन हक्क संघटन, प्रोटॉन संघटना, अपग्रेड मुख्याध्यापक संघ आणि प्राथमिक शिक्षक भारती या संघटना सहभागी होणार असल्यो रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने सांगण्यात आले. पण नगर परिषद निवडणूकांची असलेल्या आचारसंहितेमुळे या काढण्यात येत असलेल्या मोर्चावर बंधने आली आहेत. यासंदर्भात गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासन आणि शिक्षक संघटना समन्वय समिती यांयात आंदोलनाबाबत बैठक सुरू होती.









