जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 539 घरात होणार बाप्पाचे आगमन 

रत्नागिरी:-सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्यावतीने हा  सण शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात यावेळी सुमारे 114 सार्वजनिक व 1,66,539 खासगी गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.

कोकणातील हा उत्सव सर्वात महत्वाचा असून, उत्सव साजरा करण्यासाठी कोकणातीलच परंतु बाहेरगावातून (मुंबईत) असलेले लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात. या भाविकांचा कोकणातील प्रवास सुखद, विनाअपघात होण्याकरिता मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड ते राजापूर (खारेपाटण) या 213 कि.मी. महामार्गावर एकूण 20 मदत केंद्रे व 4 चेकपोस्ट उभारण्यात येणार आहेत.  ही मदत केंद्र व चेकपोस्ट 6 ते  20 सप्टेंबर 2021 रोजी रात्री 8 वाजेपर्यत कार्यान्वित राहणार आहेत.

तसेच प्रत्येक मदत केंद्रावर गणेशभक्तांच्या माहितीसाठी पोलिस विभाग, नियंत्रण कक्ष गॅरेजस, रुग्णवाहिका क्रेन यांचे संपर्क क्रमांक यांचे बॅनर्स लावण्यात येणार आहेत. महामार्गावरील उभारण्यात आलेल्या मदत केंद्रांमध्ये पोलिस विभागाचे 8 अधिकारी व 86 पोलिस कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वैदयकीय अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्याबाबत संबंधित विभागांना सूचित करण्यात आले आहे.

गणेशोत्सव कालावधीत महामार्गावर दुर्घटना घडल्यास जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी महामार्गावर वेगवेगळयरा ठिकाणी सरकारी व खाजगी रुग्णवाहिका, वैद्यकीय पथकासह नेमण्यासाठी जिल्हा प्रशासनास कळविण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे रस्त्यांची डागडुजी, दिशा अंतर दाखवणार्‍या फलकांची दुरुस्ती, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पांढरा पट्टा, रेडियम तसेच संरक्षण कट्टयाची दुरुस्ती तत्काळ करुन घण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांना कळविण्यात आलेले आहे.

सार्वजनिक मंडळांना सी.सी.टी.व्ही. लावण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.
त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासन, पोलीस विभाग तसेच रेल्वे सुरक्षा बल यांचेमध्ये समन्वय ठेवून रेल्वे मार्गावर कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याकरीता आवश्यक ती खबरदारी घेण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणेसाठी गणपती आगमन, गौरी गणपती विसर्जन व अनंत चतुदर्शी या दिवशी रत्नागिरी जिल्हयामध्ये ताडी-माडी, देशी-विदेशी दारू दुकाने बंद ठेवणे करिता जिल्हा प्रशासनाला पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडवा, यासाठी जिल्हयातील स्थानिक पोलिस ठाण्यातील पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. उत्सव कालावधीत गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगारावर तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक संदर्भातील गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी अवैध प्रवासी वाहनातून प्रवास टाळावा तसेच कोव्हिड-19 रोगाच्या अनुषंगाने शासनाकडून देण्यात आलेल्या सूचना व नियमांचे पालन करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे करण्यात येत आहे.