रत्नागिरी:- प्राथमिक शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील विविधयोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हास्तरावर आता शिक्षणाधिकारी (योजना) या नव्या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी एका शिक्षणाधिकार्यांची जिल्ह्यात भर पडणार आहे.
शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व शिक्षणाधिकारी (निरंतर) अशी पदे कार्यरत आहेत.
काही महिन्यांपूर्वी राज्य शासनाने निरंतर शिक्षण विभाग बंद करून या विभागाची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकार्याकडे सोपवली होती. तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकार्यांकडे दिवसेंदिवस कामाचा अतिरिक्त भार पडत होता. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शिक्षण संचालनालयाची पुनर्रचना करून शिक्षण संचालनालय (योजना) या नवीन कार्यालयाची रचना केली आहे. तर जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (योजना) या कार्यालयाची निर्मिती केली आहे.
या शासन निर्णयान्वये अल्पसंख्यांक व प्रौढ शिक्षण संचालनालयाचे नामांतर शिक्षण संचालनालय (योजना) असे करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजना शिक्षण संचालनालय (योजना) यांच्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.
नव्याने निर्माण होणार्या शिक्षणाधिकारी (योजना) पदाचा कार्यभार माध्यमिक शिक्षणाधिकार्याकडे देण्यात आला आहे. शिक्षणाधिकारी (निरंतर शिक्षण) कार्यालयाच्या जागेचा ताबा शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे देण्यात आला आहे. या जागेचा ताबा आता शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे वर्ग होणार आहे. योजनासंबंधीचे सर्व अभिलेखे व कर्मचारी या विभागाकडे वर्ग होणार आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या काही योजना नव्या शिक्षणाधिकार्याकडे वर्ग करण्यात येणार आहेत.









