जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात पाच वर्षात 33 हजार टनाची घट 

रत्नागिरी:-वातावरणातील बदल, बिघडलेली अन्नसाखळी आणि वाढत्या नौकांमुळे जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात दरवर्षी घट होत आहे. 2017-18 मध्ये 98 हजार 443 टन उत्पादन होते, ते 2020-21 मध्ये 65 हजार 374 टनावर आले. पाच वर्षांत 33 हजार 069 टनाची घट झाली. सर्वाधिक घट मिरकरवाडा बंदरात असून दाभोळ बंदरात मात्र उत्पादन वाढले आहे.

जिल्हयात मासळी उतरवणारी सत्तावीस केंद्र असून त्यातील पाच मोठी आहेत. या बंदरामध्ये दरवर्षी उतरवण्यात येणार्‍या मासळीच्या आकडेवारीवरुन मत्स्योत्पादन काढले जाते. 2017-18 मध्ये सागरी मत्स्योत्पादन 18.38 टक्केने, 2018-19 मध्ये 8.22 टक्केने तर 2019-20 मध्ये 10.26 टक्केने घटले. 2020-21 मध्ये मत्स्योत्पादनात 1.21 टक्के घट झाली होती. मागील चार वर्षांच्या तुलनेत ही घटीचा टक्का कमी राहिला. या वर्षी एकूण सागरी मत्स्योत्पादन 65 हजार 374 टन असून ते राज्याच्या एकूण सागरी मत्स्योत्पादनाच्या 16.40 टक्के आहे. त्यापैकी बुरोंडी क्षेत्राचे मत्स्योत्पादन 8 हजार 959 टन असून ते 2.25 टक्के आहे. जास्त मत्स्योत्पादनाचे केंद्र बाणकोट असून तेथे 1 हजार 604 टन उत्पादन मिळत्े. वेलदुर नवानगर-धोपावेतील उत्पादन 2 हजार 561 टन, दाभोळ क्षेत्राचे एकत्रित उत्पादन 19 हजार 664 टन आहे. ते एकूण मत्स्योत्पादनाच्या 4.93 टक्के आहे. जास्त मासे पकडणारे बंदर म्हणून हर्णेची ओळख आहे. तेथील उत्पादन 18 हजार 130 टन आहे. मिरकरवाडा क्षेत्राचे एकूण उत्पादन 30 हजार 823 टन असून ते एकूण उत्पादनाच्या 7.74 टक्के आहे. रत्नागिरी क्षेत्रातील जयगड बंदराचे 4 हजार 803 टन, जाकीमि-या भाटीमि-या बंदराचे 385 टन आहे.