कोकण कृषी विद्यापीठाचा अहवाल
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांसमोर यावर्षी हवामान बदलामुळे मोठे संकट उभे राहिले असून, उत्पादनात प्रचंड घट होण्याची भीती कृषी विभागाने १७ मार्च २०२६ रोजी सादर केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात जिल्ह्याचा जो संयुक्त पाहणी दौरा केला, त्यातून ही चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. या अहवालानुसार, रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याच्या उत्पादनात सरासरी ८० ते ९० टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जिल्ह्यामध्ये आंब्याखालील एकूण क्षेत्र ६८,५५० हेक्टर असून त्यापैकी ६२,२८० हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. दरवर्षी या क्षेत्रांतून हेक्टरी ३ मे.टन या सरासरी उत्पादकतेनुसार साधारणपणे १,८६,८४० मे.टन आंब्याचे उत्पादन मिळते, मात्र यावर्षी प्रतिकूल हवामानामुळे ते केवळ ३७,३६८ मे.टन इतकेच हाती येण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
हवामानातील अस्थिरता, विशेषतः दीर्घकाळ राहिलेली थंडी आणि तापमानातील सततची घट ही या नुकसानीची मुख्य कारणे असल्याचे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. यामुळे आंब्याच्या झाडांवर संयुक्त फुलांचे प्रमाण कमी होऊन नर फुलांचे प्रमाण वाढले आहे, तसेच प्रतिकूल हवामानामुळे परागीभवन नीट न झाल्याने अपेक्षित फळधारणा होऊ शकली नाही. याशिवाय पहिल्या मोहोराची फळगळ होण्याचे प्रमाण वाढले असून झाडांना पुन्हा मोहोर येत आहे, ज्यामुळे आंबा काढणीचा संपूर्ण हंगामच विस्कळीत झाला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात सारखीच असून ही एक नैसर्गिक आपत्ती असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
काजू पिकाची अवस्थाही आंब्यापेक्षा वेगळी नसून, जिल्ह्यात काजूच्या उत्पादनातही ४० ते ५० टक्क्यांची मोठी घट दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काजूचे १,१२,५५७ हेक्टर क्षेत्र असून त्यातील ९४,६८० हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. या क्षेत्रातून सर्वसाधारणपणे १,४२,०२० मे.टन उत्पादन होणे अपेक्षित असते, जे यावर्षी ५० टक्के घटीचा अंदाज धरल्यास केवळ ७१,०१० मे.टन पर्यंत खाली येण्याची चिन्हे आहेत. थंडी, धुके आणि दव यामुळे काजूचा मोहर सुकला असून काजू बोंडू व बी ची गुणवत्ताही मोठ्या प्रमाणावर खालावली आहे.
या नैसर्गिक आपत्तीच्या काळात बागायतदारांना विमा योजनेचा मोठा आधार मिळाला आहे. सन २०२४-२५ च्या हंगामासाठी जिल्ह्यातील ३०,१३५ आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ९,८९०.५७ लाख रुपयांचा विमा परतावा मिळाला असून, काजूसाठी ६,३३३ शेतकऱ्यांना ८४४.६६ लाख रुपये देण्यात आले आहेत. तसेच सन २०२५-२६ च्या चालू हंगामासाठी ३०,८४२ आंबा आणि ६,५७८ काजू उत्पादक अशा एकूण ३७,४२० शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून, नुकसानीच्या तीव्रतेनुसार त्यांना आगामी काळात आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या ४७८ आंबा उत्पादकांसाठी १०.७२ लाख आणि २१२ काजू उत्पादकांसाठी ८० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.









