रत्नागिरी:- फेब्रुवारी महिना संपत आला तरीही जिल्ह्याचा टंचाई आराखडा अजुनही तयार झालेला नाही. संगमेश्वर तालुक्याचा आराखडा जिल्हापरिषदेला प्राप्त झाला असून चिपळूणचा आराखडा तयार आहे. तालुक्यातील आराखडेच आलेले नसल्यामुळे हा उशीर होत असल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
यंदा मोसमी पाऊस लांबल्यामुळे भुगर्भातील पाणीपातळी स्थिर आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तिव्रता कमी राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. लांजा तालुक्यात एका वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा चालू झाला आहे; परंतु अजुनही जिल्ह्याचा टंचाई आराखडा तयार करण्यात आलेला नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात आराखडा जिल्हा प्रशासनाला सादर केला जातो. आरंभी तालुक्यांचा आराखडा बनविण्यात येतो. तो एकत्रित करुन जिल्ह्याचा आराखडा बनवला जातो. संगमेश्वर तालुका वगळता अन्य एकाही तालुक्यांचा आराखडा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे सादर झालेला नाही. चिपळूणचा आराखडा बनविण्यात आला असून आमदारांचीही सही झालेली आहे. अन्य तालुक्यांकडून आराखडेच आलेले नाहीत. आमदार हे त्या समितीचे अध्यक्ष असतात. पाणीटंचाई हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही त्यावरील उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जात नाही. टंचाई भासू नये यासाठी त्यावरील उपाययोजनांवर येणार्या खर्चाचा समावेश आराखड्यात केला जातो. टँकर व्यतिरिक्त पाणी योजनांची दुरुस्ती, विंधनविहिरी यासह विहीरी अधिग्रहीत करण्यासाठी निधीची तरतुद केली जाते. यामधील पाणी योजनेची कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत तर टंचाईच्या तिव्रतेमध्ये भर पडते. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून आराखडा जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जातो. पुढे तो निधीसाठी शासनाकडे देण्यात येतो.
विंधनविहिरींना विलंब
टंचाई आराखड्यातील विंधनविहिरी, पाणी योजनांची कामे दरवर्षी वेळेत मंजूरी न मिळाल्याने रखडतात. यंदा विलंब झाल्यामुळे विंधनविहिरींची कामे वेळेत चालू करण्यात अडचणी निर्माण होतील. टंचाईग्रस्त गावांमेध्ये विंधनविहिरींचा पर्याय दरवर्षी उपयुक्त ठरत असतो.