जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेत भगवती स्पोर्ट्स विजयी

प्रतीक स्पोर्ट्स उपविजेता; प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

रत्नागिरी:- रत्नागिरीत प्रथमच गणराज ग्रुपकडून आयोजित नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेला रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत अतिशय अटीतटीच्या रंगलेल्या अंतिम सामन्यात भगवती स्पोर्ट्स विजेता ठरला तर प्रतीक स्पोर्ट्स संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघाला रोख रक्कम १० हजार आणि चषक तसेच उपविजेत्या संघाला रोख रक्कम ७ हजार आणि चषक देऊन गौरव करण्यात आला.

रत्नागिरीत जिल्हास्तरीय नाईट व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रत्नागिरीतील गणराज ग्रुप कडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे ही स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर संघांनी नाव नोंदणी केली होती. यातील निवडक संघाना स्पर्धेत प्रवेश देण्यात आला होता. स्पर्धेसाठी तज्ञ पंचाना पाचारण करण्यात आले होते.

पहिल्या दिवसापासून प्रत्येक सामन्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. पहिल्या दिवसापासून रंगलेल्या प्रत्येक सामन्यातील चुरस अंतिम सामन्यात देखील पाहायला मिळाली. अंतिम सामना भगवती स्पोर्ट्स विरुद्ध प्रतीक स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये रंगला. अंतिम क्षणापर्यंत हा सामना रंगला. अखेर भगवती स्पोर्ट्स संघाने प्रतीक पोर्ट्स संघावर मात करत स्पर्धेवर आपले नाव कोरले. स्पर्धेत अंतिम सामन्यात विजयी भगवती स्पोर्ट्स संघाला रोख रक्कम १० हजार आणि आकर्षक चषक तसेच उपविजेत्या प्रतीक स्पोर्ट्स संघाला रोख रक्कम ७ हजार आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणराज ग्रुपचे मिलिंद मोरे, अमेय मोंडकर, वीरेश मयेकर, अमित लांजेकर, बापू सुर्वे, राजेश पाटील , किरण रेडिज, विपुल सावंत, आदेश काताळे यांच्यासह ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.