जिल्हा परिषदेच्या 19 शाळांना आदर्श पुरस्कार

किर्तीकिरण पुजार; संगमेश्‍वरातील एक जादा शाळा

रत्नागिरी:- शैक्षणिक वर्षामध्ये चांगले काम करणार्‍या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कनिष्ठ विभागातुन नऊ आणि वरिष्ठ गटातून दहा अशी एकोणीस शाळांना आदर्श पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याची यादी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.

जिल्हा परिषद अस्तित्वात नसल्यामुळे शाळांची निवड अधिकार्‍यांनी केली आहे. पदाधिकार्‍यांविनाच ही निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार योजनेंतर्गत जिल्हा पातळीवरील निवड समितीची 21 मार्चला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासाठी तालुकास्तरावरुन कनिष्टचे 17 आणि वरिष्ठचे 16 प्रस्ताव आले होते. या शैक्षणिक वर्षात शाळांनी राबवलेल्या उपक्रमांची पाहणी यामध्ये केली जाते. यंदा सीईओ श्री. पुजार यांनी स्वतः काही शाळांची पाहणी केली होती. पुरस्कार देताना शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, गावाच्या मदतीने राबवलेला एखादा उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी, दाखल पात्र मुले दाखल होण्याची टक्केवारी, उपस्थितीचे शेकडा प्रमाण, शाळा सिद्धी या उपक्रमांमधील कामांचा लेखाजोखा घेण्यात आला. आदर्श शाळा पुरस्कार निवड समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव, प्राचार्य स.रा. देसाई अध्यापक विद्यालय नेताजी कुंभार, बी.संतोष जाधव आदी उपस्थित होते.

तालुका – कनिष्ठ प्राथमिक शाळा – वरिष्ठ प्राथमिक शाळा

  • मंडणगड – लिडे – बौध्दवाडी प्राथमिक शाळा ढांगर
  • दापोली– मुंर्डी नं. 1- कोळबांद्रे नं. 1
  • खेड -चिंचघर – मेटकर शाळा नांदवली
  • चिपळूण -पोसरे नं. 2 -पोसरे नं. 1
  • गुहागर -जानवळे नं. 3 -काजुर्ली नं. 2
  • संगमेश्वर -कोळंबे नं. 1 -कोडये नं. 2
    -डिंगणी खाडेवाडी
  • रत्नागिरी -वाटद – कवठेवाडी गोळप नं. 1
  • लांजा – बेनी बु. -गुरववाडी वाकेड नं. 1
  • राजापूर -प्रा. शाळा बेणगी -चिखलगाव