रत्नागिरी:-कोरोनाच्या वाढत्या संक्रमनामुळे राज्यातील जिल्हा बँकांच्या निवडणुका 31 ऑगस्टपर्यंत स्थगित केल्या होत्या. मात्र राज्य शासनाने सोमवारी 9 ऑगस्ट रोजी निवडणुकांवरील स्थगिती उठवली आहे. रत्नागिरी जिल्हा बँकेच्या मतदार याद्या अंतिम करण्याची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना सहकार विभागाचे कार्यासन अधिकारी अनिल चौधरी यांनी दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा बँकेवर सध्या सहकार पॅनलचे वर्चस्व आहे.
बहुतांशी जिल्हा बँक संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाल संपून दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मे 2020 रोजी रत्नागिरी जिल्हा बँकेची निवडणूक होणार होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ही निवडणूक पुढे ढकळण्याच्या निर्णय राज्य शासनाने घेतला होता. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा बँकांसह सहकारी बँकांच्या निवडणुकांवर असलेली स्थगिती राज्य शासनाने उठवली आहे. जिल्हा बँकांची निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मतदारयाद्या अंतिम करण्यासाठीची कार्यवाही तात्काळ सुरू करा अशा सूचना अनिल चौधरी यांनी दिल्या आहेत. ज्या टप्प्यावर निवडणूक स्थगीत करण्यात आली होती. त्यापुढील कार्यवाही आता लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे.
जिल्हा बँकेच्या बाबतीत मतदारयादी तयार करण्यासाठी सभासद संस्थांनी यापूर्वी सादर केलेले ठराव विचारात घ्यावयाचे आहेत. सहकार विभागाने यापूर्वी तीनवेळा जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीला स्थगिती दिली होती. निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. त्या टप्प्यापासून प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी अशी सूचना श्री.चौधरी यांनी केली आहे. तात्पुरती मतदारयादी तयार करणे, त्यावर आक्षेप मागविणे, सुनावण्या घेऊन मतदारयादी अंतिम करण्यापर्यंत 25 दिवसांचा कालावधी लागतो.
जिल्हा बँकेवर सध्या डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या सहकार पॅनलचे वर्चस्व आहे. यामध्ये सर्व पक्षांच्या सहकार क्षेत्रातील पदाधिकार्यांचा समावेश आहे. गतवेळी डॉ. चोरगे यांनी सहकारक्षेत्रातील पदाधिकार्यांना एकत्र करुन निवडणुका बिनविरोध करण्यात यश मिळवले होते. फक्त रत्नागिरी तालुक्यासाठी निवडणूक झाली होती. त्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी स्व. नाना मयेकर यांचा पराभव केला होता. परंतु काही महिन्यानंतर किरण सामंत यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिला होता. डॉ. चोरगे यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने बँकेला फायद्यात आणले आहे. त्यामुळे डॉ. चोरगे यांच्यावरच भागधारकांचा विश्वास असल्याचे मागील वार्षिक सर्वसाधारण सभेत दिसून आले होते.