महासंघातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी
रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील रिक्त पदे भरा आणि राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करा यासह एकवीस मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद महासंघातर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
राष्ट्रीय विरोध दिनाचे औचित्य साधून काळफिती लावून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर समन्वय समितीच्या माध्यमातून संयुक्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी बी. एन.पाटील यांच्यासह उपमुख्यकार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्याकडे सुपूर्द केले. निवेदन देताना मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विजय राजेशिर्के, गौतम कांबळे, संजय पालव, रवींद्र मोहिते, मयूर पडवळ, संजय नलावडे, दिनेश सिनकर यांच्यासह जिल्हा परिषद कर्मचारी-अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा परिषदस्तरावर राष्ट्रीय विरोध दिन दुपारी जेवणाच्या वेळेत काळी फिती लावून आंदोलन करण्यात आले. जानेवारी 2020 पासून केंद्राप्रमाणे थकीत महागाई भत्ता मंजूर करा, सातवा वेतन आयोग थकबाकीचा तिसरा हप्ता प्रदान करा, कोरोना संक्रमणाने मृत कर्मचार्यांना 50 लाख सानुग्रह मंजूर करा, मयत कर्मचारी यांचे वारसांना विनाअट शासकिय सेवेत सामावून घ्या, सर्व विभागातील खाजगी कंत्राटी धोरण रद्द करुन रिक्त पदे तात्काळ भरा, अस्थायी कर्मचार्यांना स्थायी करुन समान काम समान वेतन मंजूर करा, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ कमी करुन महागाई नियंत्रणात आणा, बक्षी समिती अहवाल खंड 2 प्रकाशित करुन वेतन त्रुटी दूर करा, नवीन राष्टीय शिक्षण धोरण वीज संशोधन 2021 कायदे रद्द करा, केंद्राप्रमाणे वाहतूक व इतर भत्ते लागू करा, कंत्राटी पध्दत रद्द करुन कंत्राटी कर्मचार्यांना नियमित आस्थापनेवर कायम करा, आऊट सोअरसिंग कंत्राटी कर्मचारी भरण्याचे धोरण रद्द करा, अंशकालीन कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचार्यांना सेवेत नियमित करा, जिल्हापरिषदेतंर्गत सर्व विभागातील कर्मचारी संघटनांचे राज्य पदाधिकारी यांची मंत्रालयस्तरावर बैठकीचे आयोजन करुन प्रलंबित प्रश्न त्वरीत मागी लावा, क्षेत्रिय स्तरावरील कर्मचार्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभेची अट रद्द करा, सरकारी विभागातील आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खाजगीकरण व विक्रीधोरण रद्द करा, जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कर्मचार्यांचे वेतेन दरमहा 1 तारखेला अदा करा व पंचायत समिती क्षेत्रीय स्तरावरील सर्व कर्मचार्यांचे वेतन तालुका उपकोषागारातून अदा करा, जिल्हा परिषद संवर्गातून बाल विकास प्रकल्प ( ग्रा ) रिक्त पदे तात्काळ भरा यासह क्षेत्रियस्तरावरील ग्रामपंचायत कर्मचारी, आशासेविका , मैलकामगार , अंगणवाडी सेविका व सर्व विभागातील कर्मचारी यांचे सेवा विषयक प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.