पाणीपुरवठा, समाजकल्याणसह बांधकाम विभागाला झुकते माप
रत्नागिरी:- चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आर्थिक नियोजनाला गती मिळाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी सादर केलेल्या सन २०२६-२७ च्या ३३ कोटी ६१ लाख ७३ हजार ५०० रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच सन २०२५-२६ च्या ४५ कोटी ९० लाख ९४ हजार ९९१ रुपयांच्या अंतिम सुधारित अंदाजपत्रकावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपाध्यक्ष विलास चाळके यांच्यासह सर्व विषय समिती सभापती आणि अधिकारी उपस्थित होते.
पाणी आणि पायाभूत सुविधांवर भर
या अंदाजपत्रकात ग्रामीण भागातील मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी ३.६५ कोटी, समाजकल्याण विभागासाठी ६.४४ कोटी आणि बांधकाम विभागासाठी ५.१२ कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील रस्ते, पाणी योजना आणि सामाजिक कल्याणकारी प्रकल्पांना गती मिळण्याची शक्यता आहे.
अंदाजपत्रकात समाजकल्याण विभाग: २.११ कोटी रु., बांधकाम विभाग: ३.८७ कोटी रु., ग्रामीण पाणीपुरवठा: २.२३ कोटी रु., शिक्षण विभाग: ९५.४३ लाख रु., महिला व बालकल्याण: १.०५ कोटी रु., कृषी व आरोग्य विभाग: अनुक्रमे ८० लाख आणि ७० लाख रु. या विभागांना निधी देण्यात आलेला आहे:
विशेष म्हणजे, सामूहिक विकास विभागाच्या तरतुदीत काही प्रमाणात घट करण्यात आली असली तरी, निवृत्तीवेतनासाठीच्या निधीत वाढ करण्यात आली आहे. अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांनी मांडलेले हे अंदाजपत्रक जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केला जात आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, सभापती नंदकुमार मुरकर, महेश नाटेकर, सुयोग कांबळे, मयुरी शिर्के आणि माजी पदाधिकारी उपस्थित होते.









