मतदारसंख्येनुसार पुनर्रचना; बदलांकडे सर्वांचे लक्ष
रत्नागिरी:- जिल्हा परिषद आणि नऊ पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. मतदारसंख्येनुसार गटाची पुनर्रचना होणार असून यामध्ये जिल्ह्यातील सहा ते सात गटांची भर पडणार आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात हे बदल होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेचे सध्या 55 गट व पंचायत समितीचे 110 गण आहेत. पुनर्रचनेला मंत्रीमंडळानेही हिरवा कंदिल दिल्यानंतर नवीन निकषानुसार त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचा परिणाम गट व गणातील राजकीय समीकरणांवर होणार आहे. पाच वर्षांपुर्वी झालेल्या बदलांमध्ये दोन गण आणि चार गण कमी झाले होते. मतदारसंख्येवर आधारीत ही पुनर्रचना होणार असल्यामुळे वाढ निश्चित मानली जात आहे. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, राजापूरमध्ये गट वाढतील असा अंदाज आहे. मतदारसंख्येनुसार सहा गट वाढल्यास 61 आणि सात गट वाढल्यास 62 संख्या होईल. पंचायत समिती गणांची संख्या 122 किंवा 124 वर जाईल.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत मार्च 2022 मध्ये संपत असल्यामुळे त्यापुर्वी प्रभाग रचना करुन निवडणुक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रभाग रचना करताना विविध कारणांमुळे होणारा विलंब टाळण्याचे आव्हान असून दिलेल्या मुदतीमध्ये हे सर्व पूर्ण करावे लागणार आहे. मूदत संपण्यासाठी साडेतिन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामध्ये ही सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार असल्यामुळे लवकरच त्यावर कार्यवाही होईल अशी शक्यता आहे.









