रत्नागिरीसह १२ जि.प. मध्ये होणार निवडणूक; ७ फेब्रुवारीला निकाल
मुंबई:- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेसोबतच संबंधित निवडणूक क्षेत्रांत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
१६ जानेवारी ते २१ जानेवारी या मुदतीत अर्ज स्वीकारले जाणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारी पर्यंत आहे. ५ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
कोकण विभागातील रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग पुणे विभागातील पुणे , सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, परभणी , धाराशिव व लातूर अशा १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीमध्ये निवडणूक घेण्यासंदर्भात आज पत्रकार परिषद आहे .
या निवडणुकीद्वारे ७३१ जिल्हा परिषद सदस्य आणि १,४६२ पंचायत समिती सदस्यांची निवड केली जाणार आहे. राज्यातील एकूण २५,४८२ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पार पडणार आहे. आयोगाने १ जुलै २०२५ ची मतदार यादी या निवडणुकीसाठी निश्चित केली असून, दुबार मतदारांची नावे वगळून याद्या अद्ययावत केल्या आहेत.
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. प्रचार संपल्यानंतर सर्व प्रकारच्या जाहिरातींवर बंदी असेल. निवडणुका पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्या जिल्ह्यांत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आहे, अशाच ठिकाणी पहिल्या टप्प्यात या निवडणुका होत आहेत.









