रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद व 9 पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यासाठी प्रभाग रचनेचे प्रारुप तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
लोकसंख्येनुसार गटाची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे गट वाढण्याची शक्यता असून पाच ते सहा नवे गट स्थापन होणार असल्याची माहिती पुढे येत आहे. तसेच अध्यक्ष आरक्षणाकडेही लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेचे सध्य स्थितीत 55 गट व पंचायत समितीचे 110 गण आहेत. नव्या निर्णयानुसार लोकसंख्येनुसार गटाची पुनर्रचना होणार आहे. याबाबत मंत्रीमंडळानेही हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे गट व गणातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणे व या निवडणुकांचे संचालन व नियंत्रण करणे याची जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपावण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची मुदत संपण्यापूर्वी त्यांची सार्वत्रिक निवडणूक घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार मार्च 2022 मध्ये मुदत संपणार्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील मागील सार्वत्रिक निवडणुकीनंतर अधिसूचनेन्वये हद्दीत झालेले बदल विचारात घेण्यात यावेत, असेही या आदेशात म्हटले आहे. प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीच्या कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी विचारात घेता व निवडणूक मुदत समाप्तीपूर्वी पार पाडणे शक्य व्हावे यासाठी सध्या प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यात यावी. प्रभाग रचना करताना त्याची गोपनियता न राखणे, नियमांचे काटेकोरपणे पालन न होणे, प्रारुप प्रभाग रचने विरुध्द वाढणार्या हरकतींची संख्या, अंतिम प्रभाग रचनेविरुध्द दाखल होणार्या वाढत्या रिट याचिकांची संख्या व त्यामुळे उदभवणारी न्यायालयीन प्रकरणे आणि या सर्वामुळे होणारा विलंब टाळणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गट रचनेबरोबरच अध्यक्ष आरक्षणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.