कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील जाकमिऱ्या येथील एका ७५ वर्षीय वृद्धेचा जंगलातील आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विजया भिकाजी जाधव असे मृत वृद्धेचे नाव असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली. जाकमिऱ्या गावच्या जंगलात गवत पेटले होते. या आगीच्या भक्ष्यस्थानी विजया जाधव या सापडल्या आणि त्या गंभीररीत्या भाजल्या.
गंभीररीत्या भाजलेल्या विजया जाधव यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेने कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात हलवण्यात आले. रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास त्यांना कोल्हापूर रुग्णालयात पोहोचवण्यात आले, मात्र तेथे उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची कागदपत्रे कोल्हापूर येथून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याला प्राप्त झाली आहेत. त्यानुसार रत्नागिरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू क्रमांक १८/२०२६ नुसार नोंद केली आहे. या घटनेमुळे जाकमिऱ्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









