जयस्तंभ येथे सेंट्रींग कामाचा माल अंगावर पडल्याने तरुणी जखमी

रत्नागिरी:- शहरात भर रस्त्याच्या जवळ इमारतींची कामे सुरु आहेत. मात्र या रस्त्यावरुन जाणारे पादचारी अथवा वाहने याच्या संरक्षणासाठी उपाय योजना बांधकाम ठेकेदारांनी केली नसल्याचे आज निदर्शनास आले. जयस्तंभ येथील एका नव्या इमारतीचे काम सुरु असताना सेंट्रींगच्या कामाचा मसला चक्क एका तरुणीच्या अंगावर पडल्याने ती जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र बांधकाम ठेकेदाराच्या या मनमानी कारभारावर नागरिकांनी तोंड सुख घेतले. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास जयस्तंभ येथे घडली. ग्रामीण भागातून शहराकडे सकाळी येणाऱे महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदार, तसेच नर्सिग या संख्या जास्त आहे. जयस्तंभ हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने चारही बाजूने रस्त्यावर वर्दळ नियमित सुरु असते. सकाळी पुर्णगड येथून नर्सिंगसाठी आलेली ही मुलगी जावकर प्लाझा रस्त्यावरुन जात होती. जयस्तंभ येथील वाचनालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरु आहे. या कामावरील कामगाराने सेंट्रींगचा फावडे एवढे जोरात ओढले की, त्या मुलीच्या अंगावर सेंट्रींगचा मसला पडला. ती जागीच खाली पडली. तिच्या नाकाला व पायाला दुखापत झाली. वर्दळीचे ठिकाण असल्यामुळे नागरिकांनी हा प्रकार पाहिला आणि गर्दी केली. त्या मुलीला उठवले आणि तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. तेथील लोकांनी या बांधकाम ठेकेदारासह कामगारावर तोंडसुख घेतले. एकाने तर चक्क आत घुसण्याचा प्रयत्न केला. पण तो असफल झाला. नागरिकांनी मुलीची विचारफूस करुन तिला जिल्हा रुग्णालयात नेले. तिच्यावर उपचार सुरु आहे.