जयगड येथे कामगाराची गळफास घेत आत्महत्या

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील लेबर कॉलनीमध्ये एका कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झबन तालो मांझी (वय ४६, मूळ रा. देवघर, झारखंड) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी, १६ जानेवारी २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

​मिळालेल्या माहितीनुसार, झबन मांझी हे त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांसोबत लेबर कॉलनीतील खोलीत झोपले होते. पहाटे ३:०० वाजता त्यांच्यासोबतचा एक साक्षीदार, गुज्जर मांझी, जेवण करण्यासाठी कॅन्टीनमध्ये गेला होता. त्यानंतर पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान झबन यांनी खोलीच्या लोखंडी बारला दोरीने गळफास लावून घेतला. ५ वाजता जेव्हा ननकु बिको मांझी यांनी त्यांना या अवस्थेत पाहिले, तेव्हा तातडीने त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले.

​त्यांना तातडीने वाटद खंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अकस्मात मृत्यू क्रमांक ०४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
​ही घटना १६ जानेवारी रोजी सकाळी १०:२० वाजता उघडकीस आली असून, पोलिसांनी सकाळी ११:३१ वाजता या प्रकरणाची नोंद घेतली आहे. मृत कामगार झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील रहिवासी असून, कामानिमित्त जयगड येथे वास्तव्यास होते. या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.