जयगड-निवळी मार्गावर टाटा टिपर उलटून अपघात

रत्नागिरी:- जयगड ते निवळी दरम्यान जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एका भरधाव टाटा टिपरचा भीषण अपघात झाला आहे. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी वेगात चालवल्यामुळे गाडी रस्त्यावरून घसरून थेट झाडाझुडपात उलटली. या अपघातात गाडीचे आणि त्यातील मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. टाटा टिपर (क्र. MH 46 DC 8010) जयगडकडून निवळीच्या दिशेने जात होता. चाफे-धनगरवाडा येथील ‘पुष्प काजू बागे’समोर आले असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याची वळणे आणि परिस्थिती लक्षात न घेता गाडी भरधाव वेगाने असल्याने ती डाव्या बाजूच्या साईडपट्टीवरून घसरली आणि झाडाझुडपात जाऊन पलटी झाली.

या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशुतोष संतोषकुमार यादव (वय २२ वर्ष, व्यवसाय- क्लिनर, रा. उलवे, ता. पनवेल) यांनी याप्रकरणी चालक दिनेशकुमार खेद यादव (वय ४५ वर्ष, रा. उत्तर प्रदेश) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हा अपघात इतका भीषण होता की टाटा टिपर पलटी झाल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याचे प्राथमिक वृत्त नाही, मात्र गाडीतील मालाचे नुकसान झाले आहे. जयगड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.