पालकमंत्री उदय सामंत; ९० दिवसांमध्ये निविदा
संगमेश्वर:- कसबा येथे छत्रपती संभाजी स्मारक उभारण्यासाठी सरदेसाई यांनी जमीन देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली आहे. ही जागा सरदेसाई यांच्याकडून कशाप्रकारे घ्यायची याबाबत शंका होती. मात्र ती दूर झाली असल्यामुळे लवकरच आराखडा तयार करून स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागतिकस्तरावरील आर्किटेक नेमला आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी कसबा येथे सरदेसाई यांचा वाडा या ठिकाणी जागा पाहणी करण्यासाठी कसबा येथे आले असता मंत्री सामंत यांनी सांगितले. २९ मार्च रोजी संभाजी महाराज बलिदान दिन असून त्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या कामासाठी खर्च कितीही झाला तरी तो करण्यासाठी महायुतीचे सरकार तयार आहे. संभाजी महाराजांचे बलिदान पुढच्या पिढीला समजले पाहिजे, अशा प्रकारे स्मारक उभारण्यात येणार आहे. सरदेसाई यांची जागा कशाप्रकारे घ्यायची याबाबत शंका होती. मात्र ती दूर झाली असून लवकरच आराखडा तयार करून स्मारक उभारण्यात येणार आहे. संभाजी स्मारकासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित दादा पवार यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभत आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी जागा मालक सुभाष सरदेसाई यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना जागेबाबत माहिती दिली. तसेच या जागेचा इतिहासही सांगितला. कसबा येथील जागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जागा मालक सुभाष सरदेसाई, कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.