Monday, September 14, 2026
spot_img
Home राजापूर चिरेखाणीतील तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू

चिरेखाणीतील तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू

सडके तांदूळ असल्याचा संशय; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

​राजापूर: तालुक्यातील वाघेटी सुकाड सडा येथील चिरेखाण परिसरात अज्ञात इसमाने टाकलेले तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका गाभण गाईसह एका पाडीचा आणि पाड्याचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​पाणेरे येथील शेतकरी शांताराम यशवंत पोकळे (वय ७०) यांची गुरे वाघेटी सुकाड सडा येथील चिरेखण परिसरात चरण्यासाठी गेली होती. ४ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने त्या ठिकाणी तांदळाचे पोते टाकले होते. पोत्यातील हे तांदूळ खाल्यामुळे शांताराम पोकळे यांची तीन गुरे आजारी पडली. त्यापैकी एका पाड्याची प्रकृती अधिक खालावली होती, ज्याचा अखेर मृत्यू झाला. पाठोपाठ एक गाभन गाय आणि एका पाडीचाही मृत्यू झाला आहे. हे तांदूळ विषयुक्त होते की अन्य काही कारणाने गुरांचा मृत्यू झाला, याबाबत परिसरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

​आपल्या पाळीव जनावरांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या त्या अज्ञात इसमाविरुद्ध शांताराम पोकळे यांनी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. पोलिसांनी ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. राजापूर पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३२५ नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ४९/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, उघड्यावर अशा प्रकारे खाद्यपदार्थ टाकणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.