चिपळूण गाणे जिल्हा परिषद शाळेतील ‘त्या’ शिक्षकाचे निलंबन

रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील गाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक सतीश काशिनाथ जाधव याला गंभीर गुन्ह्याखाली पोलीस कोठडीची हवा खावी लागल्यानंतर, अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. राजापूर तालुक्यातील जुवाटी येथील प्रकरण ताजे असतानाच, १० दिवसांच्या आत रत्नागिरी जिल्हा परिषदेने केलेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश काशिनाथ जाधव याच्यावर एका गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. नियमानुसार, जेव्हा एखादा शासकीय कर्मचारी २४ तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत राहतो, तेव्हा त्याच्यावर निलंबनाची कारवाई करणे अनिवार्य असते.

लगतच्या काळातील ही दुसरी मोठी कारवाई आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वी राजापूर तालुक्यातील जुवाटी येथील एका शिक्षकावर अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता चिपळूणमधील या घटनेने जिल्हा परिषद प्रशासन आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पोलीस कोठडीतून बाहेर आल्यानंतर, संबंधित शिक्षकाचा अहवाल शिक्षण विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार ही निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. निलंबन काळात या शिक्षकाला मुख्यालय सोडून जाता येणार नाही आणि त्याच्यावर पुढील विभागीय चौकशी देखील केली जाणार अशी नोटीस बजावण्यात आली आहे.