Friday, August 14, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळूणचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित

चिपळूणचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव निलंबित

स्वअधिकारात ठेकेदाराला होते पत्र

चिपळूण:- गडनदी व जामदा प्रकल्पासंदर्भातील देयकाच्या अदायगीप्रकरणी आवश्यक मंजुरी नसताना पत्रव्यवहार केल्याप्रकरणी महाराष्ट्र शासनाने पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभाग, चिपळूणचे कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव यांना तत्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

जलसंपदा विभागाने ६ ऑगस्ट २०२६ रोजी याबाबत आदेश दिला आहे. पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाच्या विभागीय कार्यालयाने कंत्राटदारास प्रलंबित देयकाची अदायगी अनुदान उपलब्ध झाल्यानंतर करता येईल, अशा आशयाचे पत्र दिले होते. हे पत्र कोणत्या अधिकारात देण्यात आले, याबाबत चौकशी आवश्यक असल्याचे शासनाने नमूद केले आहे. या पत्रामुळे शासनावर आर्थिक भार निर्माण होण्याची शक्यता असून, संबंधित कृतीमुळे न्यायालयीन प्रकरण उद्भवले असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रकाश जाधव यांना सेवेत ठेवणे योग्य होणार नाही, असे कार्यकारी संचालक, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांनी कळविल्यानंतर शासनाने शिस्तभंगाची कारवाई करत जाधव यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, कळवा-ठाणे येथे राहणार असून पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही असेही निलंबन आदेशात म्हटले आहे.