चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड जिल्हघातील पोलादपूर तालुक्यातून चिपळूणच्या दिशेने ट्रकमधून खैरतस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलादपूर वनविभागाच्या पथकाने सापळा रचला. बनउपज तपासणी नाक्यावर ट्रकच्या फेऱ्यांच्या झडतीत ४३० खैरांचे सोलीव तुकडे व ट्रक असा ७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या धडक कारवाईने महामार्गावरून खैरतस्करी करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
खैराची तस्करी करणाऱ्या सिद्दीक अब्दुल रहिम वाढेल (रा. गोध्रा-गुजरात) याच्यासह अन्य व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. रोहा उपवनसंरक्षक आप्पासाहेब निकत, सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव, महाड परिक्षेत्र वनाधिकारी राकेश साहू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर वनपाल बाजीराव पवार, तपासणी नाका वनरक्षक नवनाथ मेटकरी, वनसंरक्षक संदीप परदेशी, सचिन मेने, नीलेश नायकवाडे, प्रियांका जाधव, अमोल रोकडे आदींच्या पथकाने सापळा रचत खैराची तस्करी रोखत पर्दाफाश केला.
सिद्दीक वाढेल हा जीजे १७/युयु ९८३७ क्रमांकाच्या ट्रकमधून पोलादपूरहून चिपळूणच्या दिशेने ६८ हजार ५७२ रुपये किमतीचे ४३० विनापरवाना खैराच्या सोललेल्या तुकड्यांची वाहतूक करत होता. टकची झडती घेतल्यानंतर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. हे खैराचे लाकूड नेमके त्यांनी कुठून आणले, याचा पोलादपूर वनविभागाच्या पथकाकडून कसून शोध सुरू आहे. खैर तस्करीचे चिपळूण कनेक्शन असल्याचे उघड झाले असून त्या दृष्टीनेही वनविभागाच्या पथकाकडून साऱ्या शक्यतांचा पडताळा केला जात आहे.









