चिपळूण:- हिट अँड रन अपघाताची धक्कादायक घटना चिपळूणात घडली आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो शहरांची आठवण करून देणारा भीषण अपघात चिपळूण तालुक्यातील काविळतली येथे ५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडला आणि परिसरात खळबळ उडाली.
चिपळुणातील बड्या नेत्याच्या या मुलाने भरधाव इनोव्हा क्रिस्टा गाडीने 50 वर्षीय रमेश कळकुट्टी या पादचाऱ्याला अक्षरशः चेंडू सारखे उडवले. गाडीचा जोरदार धक्का बसताच कळकुट्टी यांचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, अपघात झाल्या नंतर गाडी चालक थांबवण्याऐवजी थेट पळून गेला. या अपघाताच्या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप उसळला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त करत, नेत्यांच्या मुलांना कायद्याचा अजिबात धाक राहिला नाही का? असा थेट सवाल उपस्थित केला. अनेक नागरिकांनी रस्ता अडवून निषेध नोंदवला.
या घटनेने कोकणात वाढत असलेल्या बेदरकार वाहनचालक प्रवृत्तीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नियमांची आणि माणुसकीची पायमल्ली करणाऱ्या या प्रवृत्तींना त्वरित लगाम घालण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
आम आदमी मेला, पण पोलिसांना काहीच घाई नाही! कारण आरोपी कोण होता? नेत्याचा मुलगा ! अपघात घडल्यानंतर तातडीने गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना, इथे राजकीय पुढाऱ्यांची गर्दी पोलिस स्थानकात जमल्याचे चित्र होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ‘आदेश’ झाले, फोनफोनी झाली आणि मगच पोलिस प्रशासनाने हलकेच डोळे उघडले. त्यांनंतर कुठे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली.