चिपळूण विधानसभा मतदारसंघात ६१२८ अधिक महिला मतदार
चिपळूण:- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. चिपळूण विधानसभा मतदार संघात ६ हजार १२८ महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या निवडणुकीत महिला मतदारांवर उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. मतदार संघात निवडून येण्यासाठी उमेदवारांना महिलांची मनधरणी करावी लागणार आहे.
विधानसभेचा बिगुल वाजल्यापासून रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीकडून निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. एक वर्षापूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी झाली तेव्हा चिपळूणचे विद्यमान आमदार शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील झाले. शरद पवार यांनी राज्यात पुन्हा पक्षबांधणी केल्यानंतर चिपळूणमध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाला काम करण्याची संधी मिळाली. नवीन चेहरे विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयार झाले आणि महाविकास आघाडीतर्फे चिपळूणमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली आहे. दोन्ही उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. या वेळी महिलांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाकडून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. महिलांसाठी ”लाडकी बहीण” योजना सुरू केली होती; परंतु दुसरीकडे मोफत गॅस सिलिंडर व मुलींच्या मोफत शिक्षणाचा प्रश्न अधांतरीच राहिला. विरोधकांनीदेखील या योजनेवरून रान पेटवले आहे. महायुती सरकारने निवडणूक तोंडावर असताना जाहीर केलेल्या योजनांवर निवडणूक विभागाने स्थगिती आणली. त्यानंतर महिलांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्षांकडून साडीवाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. त्यामुळे यंदा तरुणी व महिला उमेदवारांची मते नेमकी कोणाच्या पारड्यात पडतात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२ लाख ७४ हजार एकूण मतदार
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या २ लाख ७४ हजार ३३८ इतकी आहे. त्यामध्ये पुरुष मतदार १ लाख ३४ हजार १०५ आहेत तर महिला मतदार १ लाख ४० हजार २३३ आहेत. म्हणजेच पुरुषांपेक्षा महिलांची संख्या ६ हजार १२८ ने जास्त आहे.